सोन्याने ओलांडला लाखाचा टप्पा   

नवी दिल्ली : अक्षय्य तृतीया आणि लग्न सराईच्या तोंडावर सोन्याने लाखाचा टप्पा ओलांडला आहे. राजधानी दिल्लीत मंगळवारी दहा ग्रॅम ९९.९ टक्के शुद्धतेच्या सोन्याचा दर (२४ कॅरेट) १,८०० रुपयांनी वाढून विक्रमी १ लाख १ हजार ६०० रुपयांवर पोहोचला.सोमवारी सोन्याचा दर प्रतिगॅम १,६५० रुपयांनी वाढून ९९,८०० वर पोहोचला होता. दोन दिवसांत सोने प्रतिग्रॅम ३,४५० रुपयांनी महागले. 
 
दरम्यान, काल ९९.५ टक्के शुद्धतेचे सोने, २,८०० रुपयांनी वाढून  १,०२,१०० वर पोहोचले. सोमवारी ते १,६०० रुपयांनी उसळून ९९,३०० वर गेले होते.अक्षय्य तृतीयेला मोठ्या प्रमाणात सोने खरेदी केली जाते. येत्या ३० एप्रिल रोजी अक्षय्य तृतीया आहे. तसेच, सध्या सुरू असलेला लग्नसराईचा हंगाम मे अखेरपर्यंत सुरू राहणार आहे. या काळातही बाजारात मोठी गर्दी असते. या दरवाढीचा सोने खरेदीवर कितपत परिणाम होतो, हे लवकरच स्पष्ट होईल.
 
डिसेंबर २०२४ पासून सोने प्रतिग्रॅम २९ टक्क्यांनी म्हणजे २२,६५० रुपयांनी वाढले आहे.  दरम्यान, काल चांदीचा दर प्रतिकिलो ९८,५०० रुपयांवर कायम राहिला.  जगातील आघाडीच्या अर्थव्यवस्था असलेल्या अमेरिका आणि चीनमधील व्यापार युद्ध आणि डॉलरच्या तुलनेत घसरता रुपया यामुळे गुंतवणूदार सोन्याकडे वळत असल्याचे सांगण्यात आले.
 
दरम्यान, आंतरराष्ट्रीय बाजारतही सोन्याच्या किंमतीत चढ-उतार दिसत आहे. काल मल्टी कमोडिटी एक्सचेंजवर सोन्याच्या जून महिन्याचे फ्युचर्स २.१४ टक्क्यांनी म्हणजेच २,०७९ रुपयांनी वाढून ९९,३५८ रुपयांवर पोहोचले.सोमवारी सोने तीन टक्के वस्तू आणि सेवा कर (जीएसटी) आकारणीसह ९९,७०० आणि मजुरीसह ते १ लाख ५ हजारांवर पोहोचले होते. शनिवारी १० ग्रॅम सोन्याचा दर ९५ हजार होता. शुक्रवारी यात १,७१० रुपयांची भर पडली होती.
 

Related Articles